बालकथा लिहिणं म्हणजे बालकांच्या भावविश्वात जाणं. त्यांच्यातील आचार-विचारांशी एकरूप होणं. हावभाव तथा बोलीभाषेशी नातं जोडणं. खरंतर ह्या बाबी सोप्या नसतात. या सगळ्यांना मनावर बिंबवत सुभाष किन्होळकर लिखित 'खाऊचे पैसे' हा बालकथा संग्रह मुलाच्या भावविश्वाशी हवहवसं आपलं नातं जोडतो. यातील प्रत्येक कथा दमदार लेखनीतून उतरल्यामुळे आपलीशी वाटते. त्यातून प्रकटणारी विविधता ही जमेची बाजू होय. कथांची सजग मांडणी, यथार्थ आशय, पात्रांचं चपखल योजन आणि संस्काराचं लेपन यामुळे हा संग्रह अधिक संपन्न झाला आहे. प्रवाहातील सहज अाणि सोपे शब्द, समर्पक संवाद, कथेतील उत्सुकता आणि लेखनलय इत्यादी बाबींमुळे सदर बालकथा संग्रह मनांत रुंजी घालतो. लेखकाने आपला भवताल आणि बाल मनाची वीण मनस्वी गुंफली आहे. त्यामुळे बाल वाचक या संग्रहाचं मनापासून स्वागत करतील, यात जराही शंका नाही.