प्रेमजीत पाटील यांचे शिक्षण वाई, सातारा, व कोल्हापूर येथे झाले. बालपणापासून निसर्गाची ओढ व आवड असल्याने कृष्णेच्या काठी व सह्याद्रीच्या सहवासात त्यांचा दीर्घ काळ व्यतीत झाला. वृक्षारोपण, वनसंवर्धन यांद्वारे निसर्गाचे जतन करण्याचा ध्यास घेऊन त्यांनी वाई, करवीर, व भोर तालुक्यांत अनेक छोटे-मोठे उपक्रम राबविले.
गेली तीन दशके प्रेमजीत पाटील शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून सध्या ते खंडाळा (जि. सातारा)येथील 'खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कुल' मध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.
'देनिसची वाडी' हे प्रेमजीत यांचे पहिले साहित्य पुष्प! त्यामधून त्यांची पर्यावरण रक्षणाची कळकळ संवेदनशील शैलीत लघुकादंबरीच्या रूपात शब्दबद्ध झाली आहे. या ‘वाडी’ ला पर्यावरणीय साहित्यात शाश्वत स्थान लाभेल, यात शंका नाही.